▪️हरंगुळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी
▪️पाण्याचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तांत्रिक सल्ला घेण्याच्या सूचना
▪️स्वच्छ पाणी पुरवठ्याला प्राधान्य; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही
लातूर, दि. २ : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या नळांना गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे. यावर तातडीने उपाययोजना करून शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्या. लातूर महानगरपालिकेच्या हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली. स्वच्छ पाणी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील आणि पाणी पुरवठा अभियंता विजय चव्हाण यावेळी उपस्थित होते.

धरणातून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग पिवळा असून, जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया झाल्यानंतरही काही प्रमाणात पिवळेपणा कायम राहतो. परिणामी, नळाद्वारे पुरवठा होणारे पाणी पिवळे दिसते. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याला महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. गरज भासल्यास जिल्हा वार्षिक योजना आणि राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिली.

पालकमंत्री श्री. भोसले यांनी हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. स्वच्छ पाणी पुरवठ्याला प्राधान्य द्यावे आणि आगामी काळात पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी करण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.