लातूर: लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एकतर्फी प्रेमाच्या संशयातून एका २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येचा सूत्रधार दुसरा कोणी नसून मृताचाच मित्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने संपूर्ण लातूर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आहद अजिन शेख (वय २०, रा. संजय नगर, लातूर) हा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी विवेकानंद पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, रविवारी सकाळी कव्हा शिवारातील शेतकऱ्यांनी विहिरीजवळ उग्र वास येत असल्याची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना आहदचा मृतदेह मिळून आला.
प्रेमाचा ‘काटा’ काढण्यासाठी रचला कट!
आरोपी आबेद मकसूद शेख (वय २६) आणि मृत आहद हे दोघे मित्र होते. आहदचे आपल्याच एका नातेवाईक मुलीवर प्रेम असल्याचे आरोपी आबेदला समजले. यावरूनच आरोपीच्या मनात आहदबद्दल तीव्र राग निर्माण झाला आणि त्याने आहदचा काटा काढण्याचा कट रचला. १५ ते २० जून दरम्यान आरोपी आबेदने आहदला कव्हा शिवारात नेले. तिथे त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात आबेदने चाकूने आहदचा गळा चिरून त्याची हत्या केली. एवढेच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आहदच्या डोक्यात दगड घालून मृतदेह विहिरीत फेकून दिला.
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या ४ तासांच्या आत आरोपी आबेद मकसूद शेख याला जेरबंद केले.
या प्रकरणी मृताचे नातेवाईक अजमोद्दीन फजले अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या क्रूर हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.