लातूर | प्रतिनिधी : निवळी (ता. लातूर) येथील मांजरा परिवारातील अग्रणी ‘विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ने आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. गळीत हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याने प्रति मेट्रिक टन ३,१७१ रुपये इतका अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. हा दर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यशस्वीपणे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याकडून देण्यात आली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या विलास साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने एफआरपीपेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे या निर्णयावरून दिसून येते.
ऊस उत्पादकांसाठी विविध विकास योजना: केवळ अंतिम दरच नव्हे, तर ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात विविध ‘ऊस विकास योजना’ कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
- ऊस बेणे व ऊस रोपे पुरवठा योजना: दर्जेदार बेणे व रोपांची उपलब्धता.
- ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी शेतकरी प्रशिक्षण: आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन.
- विलास ऊस उत्पादक संपर्क अभियान: शेतकऱ्यांशी थेट संवाद व समस्या निवारण.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) योजना: शेती नियोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. या योजनांच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना शाश्वत उत्पन्न मिळावे, यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे कारखान्याचे संस्थापक आमदार अमित विलासराव देशमुख आणि अध्यक्षा सौ. वैशाली विलासराव देशमुख यांनी नमूद केले आहे.
या उपक्रमासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन वैजनाथ शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आणि संचालक मंडळ, खातेप्रमुख, विभागप्रमुख व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


