आईच्या मजुरीच्या तुटपुंजा पगारावर गाठले खेलो इंडिया वेटलिफ्टींगचे सुवर्णपदक.
लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील आकाश गौंडने केली वजनदार किमया.
लातूर दि 30 मे घरची परिस्थिती साधारण आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते. आकाशही दोन सत्रात जीममध्ये काम करून तिला हातभार लावतो. अशा खडतर परिस्थितीत लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंड याने वेटलिफ्टिंग खेळात वजनदार कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मंगळवारी सुवर्णपदक पटकावित आकाश ठेंगणे केले आहे.

शहरातील दयानंद कला महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकणार्या आकाश गौंडने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत वेटलिफ्टिंग खेळात ५५ किलो वजनी गटात सुवर्ण किमया साधली आहे. जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्रॉंग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे. स्नॅचमध्ये १०३ किलो तर क्लीन ऍण्ड जर्कमध्ये १२५ असे एकूण २२८ किलो वजन उचलत त्याने हे सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यास प्रशिक्षक नीलेश जाधव, शुभम तोडकर, एनआयएस कोच परमज्योतसिंग सिद्धू, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी त्याचे कौतुक केले.